Tuesday, March 29, 2016

Good morning

देशी गाईच्या तुपाला मिळवलं मार्केट..
सांगली जिल्ह्यातील धनगाव (ता. पलूस) येथील तरुण शेतकरी सुनील विष्णू भोसले यांनी देशी गायी पालन व देशी तूप विक्रीतून आपली वेगळी ओळख तयार केली आहे. त्यांच्या तुपाला गोवा, मुंबईसह परिसरांतून मोठी मागणी आहे. प्रति किलो दोन हजार रुपये दराप्रमाणे त्याची विक्री केली जात आहे. सुशिक्षित तरुणांना आदर्शवत वाटावे असे काम त्यांनी केले आहे.

आयुर्वेद, औषधी गुण, अध्यात्म या अंगाने देशी गायीच्या तुपाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अलीकडच्या काळात धवलक्रांती झाल्याने संकरित गायींच्या दुधात मोठी वाढ झाली. या धांदलीत पूर्वी घरोघरी असणारी देशी गाय मात्र दिसेनाशी झाली. आरोग्यदायी दूध, तूप यांना शहरी व ग्रामीण ग्राहकही मुकू लागले.

आज मात्र आरोग्यदायी अन्नाबाबत ग्राहक जागृत झाला असून, अशा पदार्थांना मागणी वाढली आहे. हीच गरज ओळखून सांगली जिल्ह्यातील धनगाव (ता. पलूस) येथील सुनील भोसले यांनी देशी गाय संगोपन व त्यावर आधारित पदार्थनिर्मिती व्यवसायात वाटचाल सुरू केली आहे.

वीस गायींपासून सुरवात
देशी गायी संगोपनाचा निर्णय झाल्यावर बॅंक ऑफ इंडियाचे 25 लाखांचे कर्ज घेऊन 2008 मध्ये हा व्यवसाय सुरू केला. त्यातून गोठ्याचे बांधकाम, प्रक्रियेसाठी यंत्रे, वीस गीर गायी खरेदी केल्या. गुजरात, कागल येथून त्या आणल्या. घरच्या लोकांचा या गोष्टीला विरोध होता. जाणा-येणाऱ्यांच्या चर्चेचा विषय या गायी होत्या; परंतु मन विचलित न होऊ देता कामाला सुरवात केली. सुरवातीला तूपनिर्मितीबाबत पुरेशी तांत्रिक माहिती नसल्याने 25 ते 30 किलो तूप खराब झाले. सरावाने हे कौशल्य अवगत केले.

सुनील यांचे गोवंश संगोपन
1) मुक्तसंचार गोठा- मुख्य गोठ्याजवळ त्याची उभारणी केली आहे. सभोवती जाळीदार कुंपण आहे. धारा काढण्यासाठी त्या आत घेतल्या जातात. लहान-मोठी धरून गायींची संख्या सुमारे 45 आहे. पैकी 11 दुधावर तर 13 गाभण आहेत. दोन मजूर व स्वतः सुनील गायींचे व तूप निर्मितीचे व्यवस्थापन पाहतात. वर्षाला पाच ते सहा कालवडी विकतात.

2) चारा व्यवस्थापन- एकूण 20 ते 22 एकर शेतींपैकी मका व हत्ती गवताची लागवड साडेचार एकरांवर आहे. उसाची वैरण, कडबा दिला जातो. सर्व चारा सेंद्रिय पद्धतीने पिकवला जातो. गोळी पेंड, मका भरडा दिला जातो. पाड्यांना खासगी कंपनीचे खाद्य दिले जाते. गायींना घटसर्प, लाळ्या खुरकत आदी रोगांसाठी लसीकरण केले जाते. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गायींच्या आरोग्याची काळजी घेतली जाते.

अशी होते तूपनिर्मिती
- सुमारे 30 ते 35 लिटर दुधापासून होते 1 किलो तूपनिर्मिती
- प्रक्रिया युनिटमध्ये विद्युत मोटरीवर फिरणाऱ्या भांड्यात जळणावर तासभर दूध उकळले जाते. त्यानंतर थंड केलेल्या दुधाचे रात्री विरजण लावले जाते. दही बनल्यानंतर रवीने घुसळणाऱ्या पारंपरिक पद्धतीला विद्युत मोटारीची गती देऊन ते घुसळले जाते. तयार लोणी स्वच्छ भांड्यात जमा केले जाते. दुसऱ्या भांड्यात ते चुलीवर कढवले जाते. या सर्व संस्कारानंतर शुद्ध तुपाची निर्मिती होते.
-पाव, अर्धा, एक किलो असे काचेच्या बरण्यांमध्ये पॅकिंग केले जाते.

- तुपाची किंमत- 2000 रुपये प्रति किलो
- केंद्र सरकारच्या अन्न सुरक्षितता (फूड सेप्टी) विषयक संस्थेकडून उत्पादनाला रजिस्ट्रेशन क्रमांक मिळाला आहे. तूप विक्रीसाठीचे सर्व शासकीय परवाने घेतले आहेत.

ग्राहक- सांगली, कोल्हापूर, मुंबई, गोवा आदी विविध भागांतील लोक सुनील यांच्या तुपाचे ग्राहक आहेत. पुण्यातील आयुर्वेदिक क्षेत्रातील संस्थेलाही तूप पुरवले आहे. "माऊथ टू माऊथ पब्लिसीटी'द्वारा ग्राहक तयार झाले असून सुमारे 80 ते 90 ग्राहक कायमस्वरूपी जोडले आहेत.

अन्य उत्पादने
1) लोणी निर्मितीनंतर उर्वरित राहिलेल्या ताकाची मठ्ठ्यासाठी किरकोळ विक्री होते.
2) सेंद्रिय शेतीसाठी आवश्‍यक पंचगव्य व दशपर्णी अर्क तयार केला जातो. स्वतःच्या शेतीबरोबर अन्य शेतकऱ्यांनाही त्याची विक्री केली जाते.
3) गोमूत्र पहाटे संकलित केले जाते. 20 ते 25 रुपये प्रति लिटर दराने त्याची विक्री परिसरातील द्राक्ष बागायतदार वा अन्य शेतकऱ्यांना केली जाते.
4) दर वर्षी सुमारे 70 ट्रॉली शेणखत मिळते. त्याचा आपल्या शेतीसाठी वापर होतो.

ग्राहकांचे अनुभव
1) चार वर्षांपासून सुनील यांच्याकडील देशी गायीचे तूप वापरत आहे. त्याचा दर्जा चांगला आहे.
बंटी त्रिपाठी, नवी मुंबई

2) भोसले यांच्याकडील तूप मी काही वर्षांपासून वापरत असून माझ्या इतर मित्रांना ते दिले आहे.
एस. टी. मोहिते, सोलापूर

भविष्यातील नियोजन
सुनील यांनी आपली शेती टप्प्याटप्प्याने सेंद्रिय करण्यावर भर दिला आहे. यंदा दोन एकरांत गुलाबाची लागवड आहे. भोसले यांना आई सौ. मालती, वडील विष्णू, पत्नी सौ. समिधा, भाऊ अनिल यांची मोठी मदत होते. या व्यवसायाच्या आधारे अडीच एकर जमीन खरेदी केली आहे. धनगावपासून जवळ हजारवाडी येथे शंभर गायींचा मुक्त गोठा करण्याचे नियोजन सुरू आहे. देशी तूप व दुधापासून बहुधान्य आधारित (मल्टीग्रेन) बिस्किटे तयार करण्याचे सुनील यांचे भविष्यातील नियोजन आहे. म. भा. भोसले कृषी गोविज्ञान अनुसंधान संस्थेची स्थापना त्यांनी केली असून, त्याद्वारा गोवंश संगोपन प्रशिक्षण दिले जाते. एक हजारापर्यंत शेतकऱ्यांनी त्यांच्या शेताला भेट दिली आहे.

शेतकरी सुनील चित्रपट दिग्दर्शकही
शेतकरी सुनील यांच्यात सर्जनशील कलावंतही दडला आहे. पत्रकारिता क्षेत्रात काही काळ तसेच एका मराठी चॅनेलवरील "यंदा कर्तव्य आहे' या मालिकेसाठी, तसेच "ना. गणप्या गावडे' व "सुंदर माझं घर' या चित्रपटांसाठी सहदिग्दर्शन व काही भागांसाठी पटकथालेखनातही त्यांचा सहभाग होता.

No comments:

Post a Comment

Thank you for comment