पंचम लेखमाला # पाहिले पुष्प
-------------
चाळीसच दशक संपत आले होते. जग दुसऱ्या महायुध्याच्या उंबरठ्यावर उभे होते. मीरा आणि एस डी बर्मन आपल्या होणाऱ्या बाळाची वाट बघत होते. एस डी वाटायचे की त्यांना होणारे मुल त्यांचे नशीब पालटेल. 27 जुन 1939 ला साऊथ कलकत्त्यात मीरानी एका मुलाला जन्म दिला आणि त्याचे टोपण नाव ठेवण्यात आले तुबलु. मुल मोठे होत गेले आणि संगीताचे स्वर त्याच्या कानात पडत गेले. एस डी सप्तस्वरांतला " सा " लावायचे पण मुलगा मात्र " प " नि सुरवात करायचा. ठेपसीयन अशोक कुमारनी हे ऐकले आणि टोपण नाव ठेवले " पंचम " आणि मग काही दशकातच " पंचम " हे नाव करोडो लोकांच्या गळ्यातले ताईत बनल.
अभ्यासात न रमणारा पंचम शाळेत गटांगळ्या खाऊ लागला. जोऱ्यात सायकल चालवणे, पोहणे, सिगारेटी फुंकणे हे त्याचे धंदे सुरू झाले. शाळेत असलेली गती बघून सचिनदांनी त्याला संगीताकडे वळवले. साऊथ कलकत्यानी पंचमला वेस्टर्न संगीताकडे आकर्षित केले हे खरे असले तरी वेस्टर्न संगीताशी पंचमची खरी ओळख करून दिली ती केरसी लॉर्ड साहेबांनी. सुट्यात पंचम केरसी लॉर्डकडे जॅझ्झ, लॅटिन अमेरिकन, युरोपिअन आणि मिडल इस्टच्या रेकॉर्ड्स ऐकत असे. वेस्टर्न संगीताची इतकी आवड असूनही पंचमला एकही वेस्टर्न इंस्ट्रुमेन्ट वाजवता येत नसे, अपवाद माऊथ ऑर्गनचा. एल-पीच्या मते पंचम बॉलीवूडमधला माऊथ ऑर्गन वाजवणारा सर्वोत्कृष्ट वादक होता.
मग आले 1955 आणि पंचमच्या आजीच्या मनाविरुध्ध एस डी पंचमला कायमचे मुंबईला घेऊन आले आणि बॉलीवूडमधल्या पंचमच्या संगीत सफारीची सुरवात झाली. पंचमला एस डीनी आपला असिस्टंट बनवले आणि पंचम एस डींच्या संगीताचा अविभाज्य अंग बनला. "प्यासा" साठी एस डींना असिस्ट करतांना पंचमनी एक ट्यून बनवली. एस डींना ती प्रचंड आवडली आणि त्याच ट्युनच एक अफाट गाणे बनले, "सर जो तेरा चकराये". अश्याच अजून एका एस डींच्या बेमिसाल गाण्याची बीजे पेरली होती पंचमनी. त्या गाण्यासाठी पंचमनी सरोदही वाजवले आहे, गाणे होते " हम बेखुदी मे तुमको " . हे सगळे सुरू असतांनाच पंचमला माऊथ ऑर्गन वाजवण्यासाठी अनेक आमंत्रणे यायला लागली होती. 1958 साली आलेले एक अफाट गाणे " है अपना दिलं तो आवरा " आणि माऊथ ऑर्गन वाजवले आहे पंचमनी. या चित्रपटासाठी पहिल्यांदाच पंचमला क्रेडिट लाईनमध्ये जागा मिळाली " म्युझीक असिस्टंट " म्हणून.
1961 साली पंचमचा संगीतकार म्हणून पहिला सोलो सिनेमा आला आणि चित्रपटाचे नाव होते "छोटे नवाब". चित्रपट आणि संगीत तिकीटबारीवर दाणकन आपटले आणि पंचम परत एस डींकडे परतला असिस्टंट म्हणून. पंचमचा पुढचा सोलो सिनेमा आला 1965 मध्ये पण या चार वर्षात पंचमनी एस डींकडे प्रचंड काम केले. 1963 मध्ये एस डींना आलेल्या हार्ट ऎटॆक नंतर पंचमनी एस डींचा खूप सारा भार उचलला. 1961 ते 1965 या काळात बंदिनी, तेरे घर के सामने, बेनझीर, मेरी सुरात तेरी आँखे, झिद्दी, गाईड आणि तीन देवियान या चित्रपटांसाठी एस डींना असिस्ट केले. एस डींच्या हाताखाली पंचम मन लावून काम करत होता, हिऱ्याला पैलू पडत होते.
1965 च्या एस डी मॅग्नम ओपस "गाईड" मधल्या अनेक गाण्यांवर तुम्हाला पंचमची छाप दिसेल. "तेरे मेरे सपने अब एक रंग है" मधला मनोहारी सिंगचा अल्टो सॅक्स ऐका किंवा "दिन ढल जाये" मधल्या दुसऱ्या कडव्यातला. एस डी तर सांगून गेले आहेत की "गाता रहे मेरा दिलं" चा घोस्ट संगीतकार पंचमच आहे. "तीन देवीयां"च सगळं बेसवर्क पंचमनीच तयार केलेले. "तीन देवीयां"ची गाणी नीट ऐकली तर पंचमच्या जॅझ्झची छाप दिसेल तुम्हाला. किशोरदांनी गायलेल्या "ख्वाब हो तुं या कोई हकीकत" मध्ये पंचमचा हार्मोनिका ऐका किंव्हा "अरे यार मेरी तुम भी गजब" मधला कॉम्पलीकेटेड ऑर्केस्ट्रा, पंचम तुम्हाला कुठे तरी ऐकू येईलच.
साल आले 1965 आणि आला पंचमचा दुसरा सोलो सिनेमा, "भूत बंगला". यातले "आओ ट्विस्ट करे" हे गाणे बिनाका गीतमालेच्या दुसऱ्या पायदानावर पोहचले खरं पण सिनेमानी जबर आपटी खाल्ली. पंचमचा अभिनय करण्याचा प्रयोग ही फसला आणि पंचमला यशानी परत हुलकावणी दिली. 1965 सालीच अजून एक सिनेमा आला पंचमचा, "तिसरा कौन". यातले मुकेशनी गायलेले "प्यार का फसाना" हे गाणे सोडले तर बाकी काही दम नव्हता. एस डी बर्मनच्या पोराची "संगीतकार" म्हणून बॉलीवूडमध्ये चार वर्षे संपायला आली होती आणि हिट म्हणून गाणे होते फक्त एक "आओ ट्विस्ट करे". प्रचंड कर्तृत्वान बापाचा मुलगा असणे हे पण कधी कधी वाईट असत. पण जे खरे हिरे असतात ते बापाच्या सावलीच्या बाहेर येवून आपली गुणवत्ता दाखवतात आणि स्वतःसाठी आपल एक उत्तुंग शिखर निर्माण करतात. अजेय, अभेद्य आणि चिरंतर असे. पंचम त्यातलाच एक.
नासीर हुसैन " तिसरी मंजील " बनवण्याचे प्लनिंग करत होता. देव साबला हिरो म्हणून आणि दादा बर्मनला संगीतकार म्हणून घेण्याचे नक्की झाले होते पण दादा बर्मननी तब्येत बरी नसल्यामुळे तिसरी मंजिल सोडला. गोल्डीनी मग पंचमने नाव सुचवले. नासीरनी भूत बंगलाची गाणी ऐकली होती. पंचमला घ्यायला नासीर आणि गोल्डीला काहीच हरकत नव्हती. पण काही तरी फिसकटला आणि देव साहेबांनी तिसरी मंजिल सोडला. नासीरनी शम्मी कपूरला अक्षरश: हा सिनेमा साईन करण्यासाठी उचलून आणला होता. कश्मीर कि कली आणि राजकुमार हिट झाले होते आणि जानवर हिट जाणार याची शम्मीला खात्री होती. शम्मी त्याकाळी सातव्या ढगात होता अस म्हंटल तरी हरकत नाही. स्त्रीवर्गाचा तो हार्टथ्रोब होता त्या काळी. शम्मीनी तिसरी मंजिल साइन केला आणि पंचमसमोर शम्मी उभा राहिला तो एक अडथळा म्हणूनच.
शम्मीचे आवडते संगीतकार म्हणजे शंकर जयकिशन आणि ओ पी नय्यर. नव्याकोऱ्या पंचम बरोबर काम करणे हे शम्मीच्या मनाला काही पटेना. सुपरहिट संगीत असेल तर आपला सिनेमा नक्की चालतो हे गणित शम्मीला माहेत होते. शम्मी आपला संगीतकार कोण घ्यायचा यावर अडून बसला. शम्मीला सोडणे नासीरला परवडणारे नव्हते पण पंचमच्या गुणवत्तेला ओळखणारी अनेक दिग्गज लोक होती. जयकिशन आणि सचिन भौमीक साहेबांनी शम्मीला गळ घातली आणि कमीत कमी परीक्षा तरी घे हे शम्मीच्या गळ्याखाली उतरवले. त्या म्युझिक रूम मध्ये शम्मी पंचमची परीक्षा घेत नव्हता तर बॉलीवूडच्या भविष्याशी खेळत होता असे म्हंटले तरी चालण्यासारखे होते. पंचमनी " दिवाना मुझसा नही " ची चाल ऐकवली आणि त्याला मध्येच तोडून शम्मीनी त्याला सुनावले कि ही चाल मी शंकर जयकिशनला देतो आहे तू अजून गाणी ऐकव.वैतागलेला पंचम म्युझिक रूमच्या बाहेर गेला आणि जोरदार शिगारेटीचे कश मारून आला. शम्मीला त्यांनी उरलेली गाणी ऐकवली आणि पंचमचा मध्येच थांबवत शम्मीनी पंचमला ग्रीन सिग्नल दिला. शम्मीचा इगो शांत झाला पण त्याला हे माहीतच नव्हते कि " ओ हसीना जुल्फोवाली " हे गाणे गोल्डी आणि नसीरनी कधीच पास केले आहे. पंचम पास झाल्याचे कळल्याबरोबर जयकिशन साहेबांनी पंचमला फोन करून सांगितले " म्युझिक टेरिफिक होना चाहिये ". दादा बर्मनला पण वाटत होते कि पंचमनी त्याचे स्वतःचे स्थान निर्माण करावे आणि पंचमलाही हे माहीत होते कि "कूछ हटके करना पडेगा" आणि तिसरी मंजिलपेक्षा मोठी संधी त्याला मिळणार नव्हती.
भारतीय सिनेमात निखळ सस्पेन्स सिनेमे फार कमी. आपण कोणत्याची जॉनरच्या सिनेमात संगीत हे आणतोच. काही अप्रतीम सस्पेन्स थ्रिलर असलेल्या काही सिनेमांचे संगीत देखील तितकेच खास होते. महल, बीस साल बाद, वोह कौन थी हि काही उदाहरणे. पंचमसाठी हे सिनेमे म्हणजे खुणावत असलेले शिखरच. एक सेट केलेला बारच. गोल्डी दिग्दर्शीत करत अससेल्या या चित्रपटाला त्याचा खास टच होता. तिसरी मंजिल साठी अगदी अल्फ्रेड हिचकॉकला जरी आणले असते तरी अप्रतीम गाणी लागणारच होती आणि म्हणून या सिनेमाचे संगीत किती महत्वाचे आहे याची कल्पना पंचमला देखील आली होती. या सिनेमासाठी पंचमनी रॉक, जाझ, मेटल, ट्विस्ट हे सगळे प्रकार वापरले. ट्रम्पेट पासून वायलीन पर्यंत आणि सैक्स पासून सेलो पर्यंत बॉलीवूडच्या पस्तीस वर्षाच्या संगीत इतिहासात न वापरलेली सगळी वाद्ये पंचमनी आणली. वादकांसाठी तर हा सिनेमा म्हणजे जणू कुंभमेळाच. चाली आणि वाद्यांची जुळवाजुळव झाली होती आणि पंचम इतिहास लिहिण्यास सज्ज झाला होता.
त्या काळात ऑर्केस्ट्राची सुरवात तंतुवाद्य आणि मग बासरी नि होत असे. पण तिसरी मंजिल मधल्या ओ हसीना साठी पंचमनी ब्रासनी फुल ऑन सुरवात केली. ड्रम्स पण एकदम कडक. या गाण्याचे दिग्दर्शन आणि चित्रण पण गोल्डीनी फारच अफाट केले आहे. अनेक क्रेन्स वापरून वेगवेगळ्या कोनात पुढे सरकणारे हे गाणे म्हणजे माइल स्टोनच. गोल फिरणाऱ्या दारातून शम्मीची एन्ट्री होते आणि ड्रम्सवर मुखडा सुरु होतो. रफी साहेबांच्या दमदार मुखड्यावर आशाबाईंची एन्ट्री म्हणजे कहर आहे या गाण्यात. आणि या नंतर ब्रास, ट्रम्पेट आणि ड्रम्सचा तुकडा जो पंचमनी टाकला आहे त्याला तोड नाही. भव्य सेट आणि अनेक नर्तक सर्व प्रेक्षकांना आपल्या खुर्चीवर खिळवून ठेवते आणि असही संगीत टाईमलेस असू शकत याचा आपल्याला साक्षात्कार होतो. मुखडा आणि अंतराच्या मध्ये असलेले वेस्टर्न वाद्यांचे तुकडे हे आता सर्वकालीन झाले आहेत. शम्मी पण काय दिसला आहे या गाण्यात आणि हेलन खासच. रफी साहेब आणि आशाबाई पण फुल ऑन गायले आहे या गाण्यात. रफी साहेबांच्या सर्वोत्कृष्ट गाण्यात ओ हसीनाच स्थान फारच वरच. हे गाणे ऐकल्यावर मात्र सगळ्यांना पंचम हा फार वेगळा आहे याची खात्री पटायला लागली होती. तब्बल साडे सहा मिनिटांचे आहे हे गाणे पण सेकंदभर देत नाही इकडे तिकडे बघायला किंवा इतर काही ऐकायला. त्याकाळी गाणी लाइव रेकॉर्ड होत असत. तब्बल ऐंशी वादक वापरले आहेत पंचमनी या गाण्यात.
" आजा आजा मै हू प्यार तेरा " के तो क्या केहने. गाण्याची सुरवात होते ड्रम्स आणि गिटारच्या जवळपास सत्त्याहत्तर सेकंदाच्या तुकड्यांनी. चौदा गीटारीस्ट वापरले आहेत पंचमनी या तुकड्यात आणि लीड गीटारीस्ट आहेत दिलीप नाईक. दिलीप साहेबांनी वाजवलेल्या या तुकड्यावर आशाबाई प्रचंड फिदा झाल्या होत्या आणि नंतर त्यांच्यासोबत काम करू इच्छीणाऱ्या गीटारिस्टला ऑडीशन मध्ये त्या हाच तुकडा वाजवायला सांगत. दिलीप साहेबांचे भवीष्य पंचमकडे सुरक्षित होते पण ते मोहापाई अमेरिकेस गेले आणि मग त्यांचे तिथे काही विशेष बस्तान बसले नाही. असो
या गाण्यात पंचमनी सक्सोफोन आणि वाय्ब्रोफोनचा अचाट वापर केला आहे. रफी साहेब मुखड्याची अफाट सुरवात करतात या गाण्यात. याचाही एक किस्सा आहे आशाबाईनी सांगितलेला. रफी साहेबांनी गायलेला मुखडा काही केल्या पंचमला पसंद पडेना, नवोदीद संगीतकार असूनही रफीसाहेबांनी कोणतेही आढेवेढे न घेता तीन टेक दिले होते या गाण्यासाठी. रफी साहेब माणूस म्हणून किती महान होते याचे हे अजून एक उदाहरण. मुखडा आणि अंतऱ्याच्या मध्ये परत एक अप्रतीम गिटारचा पीस. रफी साहेब पहिला अंतरा गातात आणि शम्मी काय धमाल केली आहे यात. दिसला खासच आहे आणि त्याचा नाच म्हणजे कहर असेल त्या काळातल्या पोरींसाठी. दुसऱ्या कडव्यात येतात मग आशाबाई आणि आशा. आहाहा, आशाबाई काय गायल्या आहेत आणि आशा काय नाचली आहे. गुलाबी टॉप आणि काळ्या पैन्ट मध्यॆ दिसली पण छान आहे. परत एकदा गिटारची धमाल आणि पंचमचे स्पेशल इफेक्ट्स. या गाण्यात इतके मेटल असून अंतऱ्याची शेवटची नोट पंचमनी "कोमल नी" नी केली आहे. आणि मग परत एकदा शेवटचा पन्नास सेकंदाचा एक इंस्ट्रूमेंटल तुकडा. मनोहरी साहेबांचे ट्रंपेट आणि दिलीपच गिटार. अब्सोल्युट ब्लिस.
असच अजून एक अफाट गाणे आहे तिसरी मंजिल मध्ये,रफी साहेबांचे सोलो गाणे " तुमने मुझे देखा ". अतिशय संवेदनशील असलेले हे गाणे आणि यात पंचमनी वाद्यांचा आणि "मा" या नोटचा मुखड्यात आणि अंतऱ्यात अप्रतीम वापर केला आहे. साधीशी वाटणारी चाल पण कधी गाउन बघा. सचिनचा स्ट्रेट ड्राईव्ह बघणे सोपे आणि मारणे जितके कठीण, तसलच काहीतरी आहे हे. या गाण्यात काय लाजवाब ड्रम्सचे बीट्स आहेत, पंचम काळाच्या पुढेच होता याबाबतीत. हे गाणे फक्त आणि फक्त रफीसाहेबच गाऊ जाणे. आवाजाचा जो स्प्रेकट्रम या गाण्यात रफी साहेबांनी दाखवला आहे त्याला तोड नाही. या गाण्याच शूटिंग चालू होते आणि मध्येच शम्मीच्या पत्नीच म्हणजेच गीता बालीचा दुर्दैवी अंत झाला आणि शम्मी पार सैरभैर झाला होता. गोल्डीच्या बऱ्याच समजावण्यानंतर शम्मी त्या दुख:तून बाहेर आला आणि अवघ्या दोन टेक्स मध्ये हे गाणे पूर्ण करण्यात आल. पंचम-राफिसाबच्या हिट्स मध्ये फार वरच्या नंबरावर आहे हे गाणे.
एका नेपाळी फोक ट्यूनशी पंचमनी जाझ कम बोसा-नोवाच लग्न लावून दिले आणि तयार झाले अजून एक अप्रतीम गाणे, " ओ मेरे सोना रे ". हे गाणे दुसऱ्याच सिनेमासाठी बनवले होते पंचमनी पण वापरले इथे. बरेच झाले. केरसी लॉर्डच इलेक्ट्रिक ऑर्गन कसल खास आणि गिटारच्या बीट्स पण भारी. पहिली दोन कडवी आशाबाई गायल्या आणि त्यावर कळस चढवला तो रफी साहेबांनी. आउटडोअर शूट झालेले हे गाणे दिसायला पण मस्त दिसले आहे पडद्यावर. अजून एक गाणे म्हणजे दिवाना मुझसा नही. गाण सुंदर आणि त्यावर रफी साहेबांचा आवाज. रफी साहेब काय गायले आहे हे गाणे, परत ड्रम्स आणि भारतीय ट्युन्सचा अफाट संगम. शम्मीचा रोमान्स आणि पंचमचा अप्रतीम ऑरकेस्ट्रा, सबकूछ जबर. " देखिये साहीबो " हे पण अजून एक पंचम स्पेशल, स्टान्झा कसला बांधला आहे पंचमनी आणि या गाण्याचे वैशिष्ठ म्हणजे या गाण्याचा कोरस. रफी साहेब आणि आशाबाई नेहमीप्रमाणे भन्नाट. परत एकदा गिटार आणि आशाबाइंचा ल ला ला. सबकुछ खास.
तिसरी मंझील तिकीटबारीवर धो धो चालला आणि त्यात सिंहाचा वाटा पंचमच्या संगीताचा होता. मजरूह सुलतानपुरी साहेबांच्या बोलांना अफाट चाली लावल्या पंचमनी. "तिसरी मंझील" पंचम साठी "पहिली मंझील" ठरला. पंचमच्या करियरच हा चित्रपट टर्निंग पॉईंट. आता पंचमला सोलो संगीतकार म्हणून बॉलीवूडमध्ये पाच वर्षे झाली होती आणि शंकर जयकिशन या जोडीला ही सगळी गाणी ऐकल्यावर आपल्या पॉप्यूलैरिटीला स्पर्धा झाली असे वाटणे हे पंचमच्या यशाचे पहिले पाउल होते.
पंचम लेखमाला # दुसरे पुष्प
-------------
तिसरी मंझीलच्या याक्षणी पंचमचा आत्मविश्वास वाढला होता. 1966 साली त्याचा अजून एक सिनेमा आला " पती पत्नी". सिनेमा आला आणि गेला देखील. सुमार कथा आणि सुमार संगीत असलेला हा सिनेमा कोणाच्याही लक्षात राहण्याचे काहीच कारण नव्हते. "पती पत्नी पाठोपाठ आला "चंदन का पालना". परत एक सुमार कथा आणि तितकेच सुमार संगीत. तिकीटबारीवर या चित्रपटाचे काय झाले हे सांगायलाच नको. तिसरी मंझीलच संगीत नेमके एस डींचे की पंचमचे अशी चर्चा आता बॉलीवूडमध्ये सुरू झाली होती. पण मग आला नासीरचा " बहारों के सपने"
"बहारों के सपने" नी लता-पंचमच्या यशस्वी कॉम्बोची सुरवात केली. या दोघांचे एक अफाट गाणे होते " बहारों के सपने" मध्ये. "आजा पिया तोहे प्यार दु, गोरी बैयां तोपे वार दु". अतिशय सरळ आणि सोपी चाल, कमीत कमी वाद्ये आणि ब्रॅण्ड पंचमला न शोभणाऱ्या सोप्या नोटेशन्स. "आजा पिया तोहे प्यार दु" सुपरहिट झाले आणि पंचमच्या फॅन्सच्या जीवात जीव आला. "बहारों के सपने" मध्ये मन्नादा आणि लताला घेऊन अजून एक अचाट गाणे बनवले पंचमनी, "चुनरी संभाल गोरी". मन्नादा काय गायले आहेत हे गाणे, केवळ अप्रतिम. या गाण्यात पंचमनी जवळपास नव्वद सेकंदांचा प्रेल्यूड बनवला आहे. कल्पना करता येणार नाही असे प्रेल्यूड बनवणे आता पंचमचा छंदच झाला होता जणू. "चुनरी संभाल गोरी" प्रेल्यूडमध्ये पंचमनी ड्रम्सचा अप्रतिम वापर केला आहे. पंचमकडे गाणारे मन्नादा नेहमीच वेगळे वाटले आहेत मला. मन्नादांच्या अफाट गायकीचा पंचमनी पुढे "पडोसन" मध्ये जबर वापर केला.
पण खरा हिरा किती दिवस आउट ऑफ फॉर्म राहील. 1968 साली मेहमूद-पंचम जोडीचा सिनेमा आला आणि नाव होते "पडोसन" काही काही सिनेमे परत परत बघितले की त्याची गोडी अजुनच वाढत जाते. आपण तो सिनेमा पहिल्यांदा बघतो, तो खुप आवडतो म्हणुन परत बघतो आणि तो अजुनच आवडायला लागतो. मग आपण त्या सिनेमाच्या प्रेमातच पडतो, एक एक फ्रेम आणि डॉयलॉग आपल्याला पाठ होतात, पुढे येणारी फ्रेम माहीत असून आपण एन्जॉय करायला लागतो. असाच सिनेमा आहे " पड़ोसन ". अगदी मनात कायमच घर करुन बसलेला. अफाट मेहमूद आणि बेफाट किशोरचा अप्रतीम सिनेमा. पंचमनी काय ख़ास संगीत दिले आहे या चित्रपटाला, एक से बढ़कर एक गाणी आणि मुख्य म्हणजे आजही सुपरहीट.
मेहमूदनी सुनील दत्तनी केलेला भोलाचा रोल पाहिले पंचमला ऑफर केला होता. मेहमूद पंचमच्या कॉमेडी सेन्स आणि पंचेस वर फीदा होता. त्याला खात्री होती की कॉमेडियन म्हणून पंचम अफाट करियर घडवेल. अनिल बिस्वास साहेबांच्या कन्येला पण फिक्स केले होते मेहमूदनी पण पंचम नाही म्हणाला. पंचम त्यावेळेस एकदम फोकस्ड होता त्याच्या कामावर, दादा बर्मनच्या सावलीतुन बाहेर येवून पंचमला आपले नाव बनवायचे होते. १९६८ साली दादा बर्मन स्वतः जबरदस्त फॉर्म मध्ये होते, त्यांना टक्कर देवून स्वतःचे नाव करणे सोपे नाही हे पंचम ओळखून होता आणि म्हणूनच पंचमनी नकार दिला रोल ला. मग सुनील दत्त आला म्हणून सायरा पण आली. जे के झाले ते मात्र सर्वोत्तमच झाले.
पड़ोसनसाठी ९ सुपर हीट गाणी बनवली पंचमनी. सगळीच ख़ास. लताच "भाई बत्तुर" आहे, मग लता आशाच "मैं चली मैं चली" आहे. लता-पंचमच ऑल टाइम क्लासिक आहे " शर्म आती है मगर " म्हणजे तर सुरांचा पाऊसच. पण या सिनेमात सगळ्यात बेफाट गाणी मिळाली आहे किशोरकुमारला. किशोरच्या वाट्याला आलेली सगळी गाणी म्हणजे अक्षरश: बेजोड़ रत्न आहेत. प्रत्येक गाण्याच एक उत्तुंग आसन आणि बेफाट कथा देखील. मेहमूदनी पंचम आणि किशोरकुमारला फूल टू सोडला होता या सिनेमात.
"मेरे भोले बलम " हे गाण तर पंचम आणि किशोरनी सेट वर तयार केले. शब्दांना सुर लावायचे काम म्हणजे गंमत नाही पण या गाण्यासाठी किशोरदानी प्रचंड इनपुट्स दिले आहेत पंचमला. बंगाल दोतारा सारखे वाद्य वापरून पंचमनी आपल्या क्रिएटिविटीला अजुनच एका उंचीवर नेले. किशोर पण काय गायला आहे हे गाणे, निव्वळ ब्लिस. या गाण्याला काळजीपूर्वक ऐकले तर किशोर कुमारनी गायलेला आवाजाचा स्पेक्ट्रम ऐकू येईल बघा. शियर ब्लिस.
" मेरे सामने वाली खिडकी " या गाण्याची सिचुएशन बघा. सायरा समोर सुनीलला आपला आवाज सिद्ध करायचा असतो. किशोर बैकग्राउंड मध्ये गातो आहे आणि सुनील लिपसिंक करतो आहे. या सिचुएशन मध्ये सुनिलचा आवाज सायरापर्यन्त पोहोचणे महत्वाचे. पंचमला स्क्रिप्टच अफाट ज्ञान होते. या गाण्यात त्यानी अतिशय कमी वाद्य वापरली आहे. माइनर कॉर्ड वर हलक गिटार आणि पर्सियन रेसों. सुनीलची सिंगर म्हणून ओळख पटावी सायराला, हां उद्देश् अतिशय कमी वाद्यात कम्पोज़ केलेल्या या गाण्यानी साध्य होतो. किशोर अफाट गायला आहे हे गाणे आणि पडद्यावर बघतांना तर फूल टू धमाल
पण या चित्रपटाचा कळस म्हणजे " एक चतुर नार ". हे गाणे म्हणजे अनेक जुन्या गाण्यांची मेडली आहे. एक एक ओळ नीट ऐकली तर अनेक जुनी गाणी आठवतील तुम्हाला. राजेन्द्र कृष्ण साहेबांनी आणि पंचमनी एकत्र बसुन या गाण्याला सेट केले आहे. ट्यून तयार करुन मीटरमध्ये शब्द अतिशय चपखल बसवले आहेत. पड़ोसनच्या संपूर्ण टीमला या गाण्याच महत्त्व माहीत होते या सिनेमात. दोन क्लासिकल गायकांमधली ही लढाई पाहिले रेकॉर्ड करणे आणि मग शूट करणे म्हणजे कहर डिफीकल्ट काम पण पंचम आणि मेहमूदनी हे शिवधनुष्य अफाट पेलले आहे. कानाला आनंद देणारे हे गाणे पडद्यावर बघतांना देखील फार मजा येते.
या गाण्यात मेहमूदला आवाज दिला आहे मन्नादानी. किशोरला किशोरनी, मन्नादांना या गाण्यात पराभव स्वीकारायचा असतो आणि हे त्यांना तत्वतहा मान्य नव्हते. मन्नादा म्हणजे ट्रेन्ड क्लासिकल गायक आणि किशोर स्वतः शिकलेला. किशोरनी पण मन्नादांच समाधान होइस्तो रिहर्सल केली या गाण्याची. अनेक तास रिहर्सल झाल्यावर हे गाणे रेकॉर्डिंगला आले आणि ओरिजिनल गाण्यात नसलेले इम्प्रोव्हायजेशन किशोरनी ऐन वेळेस टाकले. "ओ तेढे, सीधा हो जा रे " हे मुळ रचनेत नव्हतेच. पण पंचमनी त्या हिरवा बावटा दाखवला आणि मग पुढे हे गाणे इतिहासच बनले. हे गाणे मन्नादा आणि किशोरसाठी अफाट चैलेंज होते. फाइनल रेकॉर्डिंग ऐकल्यावर मात्र मन्नादांनी किशोरला शाबासकीच दिली. मोठ्या मनाची अफाट माणसे ही बाकी काही नाही.
पड़ोसन यायच्या आधी पंचमची ओळख दादा बर्मनचा मुलगा आणि मेहमूदचा दोस्त अशी होती मुंबईत, नाही म्हणायला तीसरी मंझीलची गाणी सुपर हीट झाली होती. पण बऱ्याच जाणकार लोकांनी त्या ट्यून्स प्रत्यक्षयात दादा बर्मनच्या आहेत असा ही सुर लावला होता. पण पड़ोसननी पंचमच स्थान बॉलीवुड मध्ये पक्के केले. पड़ोसन मध्ये कर्णाटकीय वाद्यांचा अफाट वापर केला आहे पंचमनी आणि वेस्टर्नच्या कोशातून बाहेर येण्याची ती सुरवात होती. तो नुसताच आला नव्हता तर अनेक वर्षे रासिकांच्या रुधयावर राज्य करण्यासाठी आला होता हे पड़ोसन मुळे अनेकांच्या लक्षात आले.
पडोसनच्या तुफान यशानंतर आला "अभिलाषा". अजून के चित्रपट जो बॉक्स-ऑफिसवर साफ कोसळला. सुमार कथा आणि तितकेच सुमार संगीत. एक सुपरहिट आणि एक सुपरफ्लॉप असं काहीतरी पंचमच सुरू होत. पण अभिलाषा मधला "वादीयां मेरा दामन" हे गाणे नाही महिन्याला बरेच चालले. 1969 साली परत नासीरनी सिनेमा बनवला आणि तोही आउट अँड आउट म्युझीकल. नाव होते "प्यार का मौसम". पंचमनी परत एकदा नासिरसाठी सुपरहिट संगीत बनवले.
टायटलच " नि सुलताना रे " हे गाणे म्हणजे फोक संगीत वापरून पंचमनी बनवलेले पाहिले चित्रपट गाणे. नॉर्थ इंडिअन फोक चालीवर असलेल्या या गाण्याचे लता-रफीनी अक्षरशः सोने केले. गाण्याची सुरवातच रफी-लतानी इतकी भन्नाट केली आहे की विचारायची सोय नाही. फोक संगीत आणि फार कमी वाद्ये वापरून पंचमनी हे अफाट गाणे बनवले पण याच चित्रपटात पंचमनी लताला तिच्या करियरमधल अजून एक बेमिसाल गाणे दिले. "ना जा ओ मेरे हमदम". लताच्या आवाजाची जादू काय चालली आहे या गाण्यात. पंचमनी या गाण्यात ऍकॉस्टिक गिटार, ट्रँगल बरोबर चर्चच्या घंटीचा देखील वापर केला आहे.
पण "प्यार का मौसम" मधलं सुपरहिट गाणे म्हणजे "तुं बिन जाऊ कहा". हे गाणे पंचमनी रफी साहेब आणि किशोरदा कडून गाऊन घेतले. चित्रपटाचे प्रमोशन करतांना नासीरनी रफी-किशोर जुगलबंदीचा वापर केला. पण हे गाणे चित्रपटात वापरतांना रफी साहेबांवर थोडासा अन्यायच केला नासीरनी. सर्वोत्तम सिच्युएशन मध्ये नासीरनी किशोरदांच्या आवाजातले गाणे वापरले. आणि आज ही "तुं बिन जाऊ" म्हंटले की किशोरचच वरझन आठवते.
1969 मध्ये अजून एक सिनेमा आला पंचमचा "वारीस" , आला आणि गेला. त्यावर बोलण्यासारखे काही नाही. पण 1961 ते 1969 या दशकात पंचमनी बॉलीवूडमध्ये आपले स्थान पक्के केले होते. या दशकात पंचमनी फक्त 11 चित्रपट केले.पण म्हणतात न पाया मजबूत असला की पुढील वाटचाल सोपी होते. या पाया घडवण्याच्या दशकात पंचमनी अजरामर "तिसरी मंझील आणि पडोसन"च संगीत बनवले होते आणि हे दोन्ही चित्रपट सुपरहित होण्यात पंचमच्या संगीताचा सिंहाचा वाटा होता. पंचम आता आपल्या खांद्यावर सिनेमाचे ओझे वाहून न्यायला तयार झाला होता. पुढील दोन दशके पंचमला बॉलीवूडचा सर्वोत्तम संगीतकार होतांना बघणार होती. एका ग्रेट संगीतकाराचा लिव्हिंग लिजंड बनण्याचा प्रवास सुरू झाला होता.
दुसरा शापित,पंचम-
आज त्याचा वाढदिवस . पंचमबदल आज एव्हढे लिहून येते की त्याला त्याच्या कारकिर्दीत किती सन्मान मिळाले असतील असेच वाटेल. पण नाही. तसा तो दुर्लक्षित राहिला. रूढ समजूतींना धक्का देणारा बंडखोर होता तो. अक्षरशः कुठल्याही वस्तूचा आवाज ऐकला तरी काही तरी सुचत असे. ग्लास,चमचा, झाडू,कंगवा, कारचे बॉनेट काहीही निषिद्ध नव्हते त्याला. सत्ते पे सत्ता मधे अमिताभच्या दुसऱ्या किरदाराच्या,बाबूच्या एन्ट्रीला चक्क बासरीच्या सुरात एकाला गारगलिंग करायला लावले आणि जो इफेक्ट आणला तो खूप गाजला ऱ्हिदम किंग एकच शब्द ...
दादा बर्मन यांच्या छायेखाली ६० चे दशक वावरला. १९६१ मधे पदार्पणातच " घर आजा घिऱ आई " मधे त्याने लताच्या गायकीला आव्हान दिले. खूप अवघड चाल आहे ती. "छोटे नवाब" सुभानल्ला ठरतील याची कल्पना कोणी केली नसेल. टेरिफिक "तिसरी मंझिल" , वैविध्यपूर्ण "बहारों के सपने", धमाल "पडोसन" आणि मेलोडियस "प्यार का मौसम" ही त्याची या दशकातील रेंज . दादा बर्मन आजारी असताना पूर्ण केलेला "आराधना" आहेच. "पडोसन" मधील "शर्म आती है मगर" नुसते गुणगुणा कळेल काय कठीण चीज आहे ती. "बहरोंके सपने" मधील लतादिदींच्या "क्या जानू सजन " मधे केलेला शॅडो व्हॉइसचा प्रयोग पण असाच जबरदस्त.
७० च्या दशकात त्याने घातलेला धुमाकूळ सर्वज्ञात आणि सर्वश्रुत आहे. ३३ वर्षांच्या कारकिर्दीत फक्त एकदा त्याचे गाणे बिनाका टॉपला आले. १९७२ साली "हरे राम हरे कृष्ण" मधील "दम मारो दम". पण माझ्या मते १९६८ मधे "पडोसन" ऐवजी "शागीर्द ", १९७५ ला "आंधी" समोर "रोटी कपडा और मकान" , १९७७ मधे "हम किसीसे कम नही"च्या जागी "लैला मजनू" आणि १९७८ मधे "घर"च्या जागी "अखियोंके झरो को से" हा अन्यायच म्हणायचा.
६० आणि ७० ची दशके उलटून गेली त्याला फिल्मफेअर मिळाले नव्हते. बरेच वेळा नॉमिनेशन मिळायची अवॉर्ड दुसराच घेऊन जायचा. पहिले फिल्मफेअर १९८३ ला "सनम तेरी कसम" च्या कामचलाऊ कामगिरीला , नंतर लगेच पुढच्या वर्षी "मासूम" आणि ११ वर्षांनी मरणोत्तर "१९४२ अ लव स्टोरी" ला . १४ नॉमिनेशन्स और अवॉर्ड सिर्फ ३ ? बहुत नाईन्साफी है ये.
कटी पतंग, अमर प्रेम, शोले,आंधी, परिचय, खुशबू, घर, यादों की बारात , कारवा असे असंख्य सिनेमे पारखे झाले होते. पंचम किशोर बरोबर रमला. दोघांनी धमाल उडवून दिली. "मेरे नैना सावन भादो" साठी राजेश खन्नाचा हट्ट पुरवण्यासाठी शक्ती सामंताशी पंगा घेत किशोरच्या गायकीचा कस घासून घेतला. त्यांना रफी हवा होता. त्याने स्वतः गायलेली गाणी सुद्धा गाजली. त्याचे आशा बरोबरचे "खेल खेल में" मधले ड्युएट " सपना मेरा टूट गया " मला सगळ्यात आवडते.
नासिर हुसेन,गुलजार,शक्ति सामंता इन तीन बंबुओंके ऊपर उसका तंबू खडा था. राजेंद्रकुमार, सुनील दत्त आणि धर्मेंद्र यांनी आपापल्या सुपुत्रांना लॉंच करताना पंचमलाच पाचारण केले. अनुक्रमे "लव स्टोरी", "रॉकी" आणि "बेताब" आणि त्याने निराश केले नाही.
हल्ली पंचमचे जेव्हढे कार्यक्रम होतात तेव्हढे कोणाचेच होत नाहीत. आज त्याच्या इतर समकालीन संगीतकरांपेक्षा पंचमच ऐकला जातो ही त्याला मिळालेली खरी पावती आहे. ही इतकी लोकप्रियता अनुभवायला तो आज नाही. पुढच्या प्रत्येक पिढीला भावेल असे संगीत त्याने दिले. कालातीत होता तो. पहिले रीमिक्स बहुधा "कांटा लगा " आहे . ते लताने गायलेले त्याच्या "समाधी"तील आहे.
त्याची काही गाणी अशी आहेत की कानावर पडली तर लगेच मूड बदलतो. हात,पाय,मान ठेका धरू लागतात. माझ्यासाठी या गाण्यात काहीतरी वेगळीजादू आहे पटकन आठवली. एक डझनभर देतो. ही त्याची बेस्ट नसतील पण माझ्यासाठी मूड चेंजर आहेत.
ओ मेरे सोना रे...... तिसरी मंझिल
मुसाफिर हूँ यारो......परिचय
चला जाता हूँ.......मेरे जीवन साथी
नदिया से दरीया.... नमक हराम
देखा ना हाय रे सोचा ना ..... बॉम्बे टू गोवा
गुलाबी आँखे......द ट्रेन
रिमझिम गिरे सावन....... मंझिल लता व्हर्जन
कह दू तुम्हे......दिवार
अब के सावन मी जी डरे......जैसे को तैसा
जय जय शिव शंकर..... आप की कसम
भली भली सी इक सुरत......बुढा मिल गया
कितना प्यारा वादा...... कारवा
९१.९ हे नवे एफ एम चॅनेल सुरु झाले आहे. त्यावर अमिताभ त्याच्या ठेवणीतील आवाजात म्हणतो
"पंचमदा आपको जिंदगी मी जो सन्मान मिलना था वो नही मिला, मगर हमारे दिलोंपर तो आप ही छाये हुए है ". एका प्रकारे सगळ्या रसिकांच्या भावनाच त्याने व्यक्त केल्या आहेत नाही का ?
-- अानंद देवधर, विले पार्ले.
No comments:
Post a Comment
Thank you for comment