मन चिंब पावसाळी
मन चिंब पावसाळी झाडात रंग ओले
घनगर्द सावल्यांनी आकाश वाकलेले
पाऊस पाखरांच्या पंखात थेंबथेंबी
शिडकाव संथ येता झाडे निळी कुसुंबी
घरट्यात पंख मिटले झाडात गर्द वारा
गात्रात कापणारा ओला फिका पिसारा
या सावनी हवेला कवळून घट्ट घ्यावे
आकाश पांघरोनी मन दूरदूर जावे
रानात एककल्ली सुनसान सांजवेळी
डोळ्यांत गलबताच्या मनमोर रम्य गावी
केसात मोकळ्या या वेटाळुनी फुलांना
राजा पुन्हा नव्याने उमलून आज यावे
मन चिंब पावसाळी मेंदीत माखलेले
त्या राजवंशी कोण्या डोळ्यात गुंतलेले
- ना.धो.महानोर
माऊलीच्या दुग्धापरी
आले मृगाचे तुषार,
भुकेजल्या तान्ह्यासम
तोंड पसरी शिवार !
तुकोबाच्या अभंगाला
टाळ चिपळ्यांची साथ,
वाजताहे रानवारा
चिवारीच्या झुडुपांत !
पिऊनिया रानवारा
खोंड धावे वारेमाप
येता मातीचा सुगंध
स्तब्ध झाला आपोआप !
अवखळ बाळापरी
पक्षी खेळतो मातीत
उभारल्या पंखांवरी
थेंब टपोरे झेलीत !
धारा वर्षता वरून
बैल वशिंड हालवी
अवेळीच फुटे पान्हा
गाय वत्साला बोलवी !
गावानेच उंच केला--
हात दैवी प्रसादास,
भिजुनिया चिंब झाला
गावदेवीचा कळस !
निसर्गाने दिले धन--
-- द्यावे दुसऱ्या, जाणुनी
झाली छप्परे उदार
आल्या पागोळ्या अंगणी !
स्नान झाले धरणीचे
पडे सोन्याचा प्रकाश !
आता बसेल माऊली
अन्न ब्रम्हाच्या पूजेस !
-ग. दि. माडगूळकर
No comments:
Post a Comment
Thank you for comment