Monday, September 5, 2016

गॅस गिझर बाबत काळजी

गॅस गिझर चुकवतोय काळजाचा ठोका!

औरंगाबाद - जळालेल्या गॅसमधून कार्बन मोनाक्‍साईड हा विषारी वायू तयार होतो, हे कदाचित तुम्हाला माहिती नसेल. पण, असा वायू तयार होत असताना हवाबंद स्नानगृहामध्ये आंघोळ करीत असाल, तर ते तुमच्या जीवावर बेतू शकते. शहरात एकाच महिन्यात अशा तीन घटना घडल्या आहेत.

असा प्रसंग बेतला होता शहरातील सिडको एन-दोन भागात राहणाऱ्या प्रज्वल दाणेकर या तेरावर्षीय मुलावर. मंगळवारी (ता. 30) प्रज्वल शहरातीलच मावशीकडे गेला होता. मावशीच्या घरी स्नानगृहात गॅस गिझर होते. तो आंघोळीला गेला. बराच वेळ झाला तरी प्रज्वल बाहेर येईना, म्हणून मावशी पाहायला गेल्या. दार वाजवले तरी प्रज्वलचा काहीच प्रतिसाद नव्हता. मावशीने दार तोडून आत पाहिले तर प्रज्वल बेशुद्ध पडलेला दिसला. त्यांनी तत्काळ कृत्रिम श्‍वासोच्छ्वास देण्याचा प्रयत्न करीत प्रज्वलला एका खासगी दवाखान्यात नेले. घटनाक्रम सांगितल्यानंतर डॉक्‍टरांना सर्व प्रकार लक्षात आला. याच महिन्यात अशाच प्रकारच्या दोन घटना घडलेल्या असल्याने डॉक्‍टरांना योग्य निदान करता आले. गिझरच्या जळालेल्या गॅसमधून तयार झालेल्या कार्बन मोनाक्‍साईड या विषारी वायूमुळेच प्रज्वल बेशुद्ध झाल्याचे मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. मकरंद कांजाळकर यांनी सांगितले.

गॅसची बचत होण्यासाठी अनेकजण स्नानगृहात गॅस गिझर बसवत आहेत. स्वयंपाकाच्या गॅसवर पाणी तापवून ते स्नानगृहात घेऊन जाणे, हे "हाय कल्चर‘ला शोभत नसल्याचा अनेकांचा समज आहे. त्यामुळे पैसा खर्चून श्रीमंतांसह मध्यमवर्गीयही पाणी तापविण्यासाठी गॅस गिझरचा वापर करतात. पण गिझर वापरताना गॅस सिलिंडर बाथरूमच्या बाहेर असावे लागते. तुरळक नागरिक हा नियम पाळतात. फ्लॅटमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे स्नानगृह तर अगोदरच कोंदट असते. त्यामुळे फ्लॅटमधल्या गिझरचे सिलिंडर हे स्नानगृहातच बसविलेले असते.

""जळालेल्या गॅसमधून अदृश्‍य धूर बाहेर पडतो. हा अदृश्‍य धूर म्हणजेच कार्बन मोनाक्‍साईड. कार्बन मोनाक्‍साईड शरीरात गेला तर हिमोग्लोबीनपर्यंत ऑक्‍सिजनचा पुरवठा होत नाही. परिणामी तात्काळ चक्कर येणे, भोवळ येऊन पडणे असे प्रकार घडतात. आंघोळीला गेलेली व्यक्ती चक्कर येऊन पडल्याचे जर लवकर लक्षात आले नाही, तर मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे शक्‍यतो गॅस गिझर वापरणे टाळावे अथवा गिझरचे सिलिंडर स्नानगृहाबाहेरच लावावे.‘‘
- डॉ. मकरंद कांजाळकर, मेंदूविकारतज्ज्ञ तथा संचालक, माणिक हॉस्पिटल.

No comments:

Post a Comment

Thank you for comment