स्वाभिमानी छत्रपती
छत्रपती शाहू महाराज रयतेप्रती जितकी निष्ठा बाळगून होते तितकाच त्यांना स्वतःच्या कुळाचा व पूर्वजांचा अभिमान होता. महाराज छत्रपती होते. औरंगजेबाच्या दरबारात खुद्द औरंगजेबास खडे बोल सुनावणारे शिवछत्रपति महाराजांचे वंशज होते त्यामुळे शाहू महाराजही शिवरायांइतकेच स्वाभिमानी होते.
ब्रिटनची राणी व्हीक्टोरियाच्या मृत्यूनंतर ब्रिटिश सम्राट म्हणून किंग एडवर्डचा राज्याभिषेक होणार होता. १९०२ साली होणाऱ्या या राज्याभिषेकासाठी भारतीय संस्थानिकांना निमंत्रित करण्यात आले होते. छत्रपती शाहू महाराज या संस्थानिकांचे प्रतिनिधीत्व करणार होते. राज्याभिषेक समारंभासाठी महाराज लंडन नगरीत दाखल झाले. महाराजांच्या स्वागतासाठी लंडनमध्ये ब्रिटिश साम्राज्यातर्फे एकवीस तोफांची सलामी देण्यात आली. ब्रिटिश सरकारच्या सर्वोच्च अधिकाऱ्यांनी महाराजांस लष्कराच्या संचलनात बंकींघम पँलेसमध्ये आणले. छत्रपतींच्या लौकीकास साजेसे असे महाराजांचे स्वागत करण्यात आले. बंकींघम पँलेसमध्येही छत्रपतींसाठी अत्यंत खास अशी व्यवस्था करण्यात आली होती.
राज्याभिषेक दिनी ब्रिटनचा शाही दरबार भरला. ब्रिटिश अंमलाखाली असणारे जगभरातील राजे या संमारंभास उपस्थित होते. महाराजांसाठी विशेष अव्वल बैठक व्यवस्था होती. महाराजांपाठोपाठ भारतातील इतर संस्थानिकांसाठी बैठक व्यवस्था होती. प्रमुख सोहळा संपन्न झाल्यानंतर किंग एडवर्डच्या दरबारास सुरुवात झाली. जगभरातील राजे आपला नजराणा अर्पण करुन एडवर्डला कुर्निसात करीत होते. सर्व भारतीय राजांनंतर प्रमुख प्रतिनिधी छत्रपती शाहू महाराज नजराणा अर्पण करुन कुर्निसात करणार होते. ठरल्यानुसार सर्व भारतीय राजांनी एडवर्डला कुर्निसात करुन नजराणे अर्पण केले. त्यानंतर छत्रपती शाहू महाराजांनी मराठा दौलतीतर्फे नवीन बादशहास भेट सादर केली मात्र कुर्निसात करण्यास भर दरबारात नकार दिला. "मी कुणाचा अंकीत नाही. मी मराठा साम्राज्याचा सम्राट आहे त्यामुळे मी कुर्निसात करणार नाही. एक राजा म्हणून दुसऱ्या राजाशी मी हस्तांदोलन करीन, फारतर आलिंगन देईन." अशी स्पष्ट भूमिका महाराजांनी घेतली. जगभरातील राजांसमोर उगाच शोभा नको म्हणून बहुधा ब्रिटिश सरकारने त्यावेळी प्रकरण वाढवले नाही मात्र दरबार बरखास्त झाल्यानंतर महाराजांना नजरकैदेत ठेवण्यात आले. या प्रसंगाची चौकशी करण्याचे आदेश किंग एडवर्डने जारी केले. त्यानुसार ब्रिटिश सरकार मार्फत महाराजांची चौकशी करण्यात आली. महाराज आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. 'मी कुणास मुजरा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी सुद्धा एक राजाच आहे, मराठा दौलतीचा अधिपती आहे त्यामुळे मी किंग एडवर्डशी शेकहँडच करेन' अशी ठाम भूमिका महाराजांनी घेतली. ब्रिटिश सरकारला महाराजांची भूमिका मान्य करावी लागली. महाराजांनी ब्रिटिश सम्राटास कुर्निसात करण्यास भर दरबारात नकार दिल्यामुळे उपस्थित जगभरातील राजांमध्ये मराठा दौलतीची व छत्रपतींची एक वेगळीच आदरयुक्त प्रतिमा निर्माण झाली.
या प्रसंगाचा करवीर राज्यावर अत्यंत प्रभावी परिणाम झाला. त्याकाळी पाकीस्तानसहीत संपूर्ण भारतामध्ये "करवीर" हे एकमेव स्वतंत्र व सार्वभौम राज्य होते. इतर कोणत्याही राज्यामध्ये राजाचा पारंपारिक ध्वज अधिकृतपणे फडकविण्यास ब्रिटिश सरकारने बंदी घातली होती. शिवाय राजपत्रांवर व राजाज्ञांवर ब्रिटिशांचा शिक्का असायचा. मात्र संपूर्ण भारतात फक्त कोल्हापूरमध्येच जरीपटका डौलाने फडकायचा. छत्रपतींच्या सर्व राजाज्ञा व करवीरचा संपूर्ण राज्यकारभार शाहू महाराजांच्या शिक्क्यांनी व श्री राज्याभिषेक शकानुसार होत होता. करवीरच्या राज्यकारभारात इंग्रज सरकार कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करु शकत नव्हते हे इंग्रजांच्याच काही पत्रांमधून सिद्ध होते. महाराजांनी गव्हर्नरसाठी वेगळा बंगला बांधून दिला होता. फक्त त्यावरच Union Jack फडकत असे. पुढे १९११ साली दिल्ली येथील दरबारावेळी किंग जॉर्ज या इंग्रज सम्राटाने सर्व भारतीय राजांकडून स्वतःस कुर्निसात करवून घेतले होते मात्र छत्रपती शाहू महाराजांस स्वतः आलिंगन दिले होते.
ज्याप्रमाणे शिवरायांनी औरंगजेबाच्या दरबारात मराठ्यांचा स्वाभिमान जपला होता त्याप्रमाणे शाहू महाराजांनीही शिवरायांचा वारसा सांगत छत्रपतींच्या स्वाभिमानाला ठेच लागू दिली नाही.
No comments:
Post a Comment
Thank you for comment