Monday, April 4, 2016

 

मुंबई : दरवर्षी अन्न आणि औषध प्रशासनाकडून कृत्रिमरीत्या आंबे पिकवणाऱ्यांवर करडी नजर ठेवत हजारो टन आंबे जप्त करत नष्ट केले जातात. त्याप्रमाणे यंदाही कृत्रिमरीत्या आंबे पिकवणाऱ्यांवर एफडीएची करडी नजर आहे. दोषींविरोधात खटले भरण्यात येणार असल्याची माहिती एफडीएतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

वाढत्या मागणीचा फायदा घेत नफा कमावण्यासाठी आंबे व्यापारी-विक्रेत्यांकडून कृत्रिमरीत्या आंबे पिकवण्याचे प्रकारही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे एफडीएकडून एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून कृत्रिमरीत्या आंबे पिकवणाऱ्यांविरोधातील कारवाईसाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे. मोठ्या-मोठ्या बाजारपेठांमध्ये जाऊन अन्न निरीक्षक आंब्यांचे नमुने घेत ते तपासणीसाठी पाठवणार आहेत. अहवालानंतर दोषींविरोधात खटले भरण्यात येणार आहेत. कृत्रिमरीत्या आंबे पिकवण्याच्या गुन्ह्यासाठी ३ वर्षांचा कारावास आणि दंड अशा शिक्षेची तरतूद आहे. 
 
नैसर्गिकरीत्या आंबा पिकण्यासाठी ५ ते १० दिवसांचा काळ लागतो. त्यामुळे झटपट एक-दोन दिवसांत आंबे पिकवत आंब्याची विक्री करण्याकडे व्यापारी-विक्रेत्यांचा कल असतो. म्हणूनच अनेक व्यापारी-विक्रेते कॅल्शियम कार्बाईडचा वापर करून आंबे पिकवतात. कार्बाइडमुळे दोन दिवसांत आंबे पिकतात. पण हे आंबे सतत खाल्यास अॅसिडिटी, उलट्या आणि मळमळण्यासारखे त्रास होऊ शकतात. त्यामुळे आंबे खरेदी करताना ग्राहकांनी आंब्याच्या पिवळ्या धमक रंगाला न भुलता हिरवट-लालसर, सुरकुत्या पडलेल्या आंब्याची खरेदी करावी, असे आवाहन एफडीएने केले आहे.
 

No comments:

Post a Comment

Thank you for comment